
हिंगणघाट : नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली. या कारवाईत २५ म्हैस जातीच्या नर जनावरांना निर्दय कत्तलीपासून वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरात गस्त घालत असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, एक टाटा कंपनीचा कंटेनर (क्र. आर.जे.१० जीबी ७७८९) मधून म्हैस जातीचे नर कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी कलोडे चौक येथे सापळा रचून नाकाबंदी केली. काही वेळातच संशयित कंटेनर भरधाव वेगाने येताना दिसताच पथकाने तो अडवून तपासणी केली.
तपासात कंटेनरमध्ये २५ म्हशींना अत्यंत निर्दयतेने, चारा-पाण्याविना कोंबून नेण्यात येत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ वाहनासह पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे अनुक्रमे — मस्तकिम इलियास खान (२५), अरमान इस्राईल खान (१९), शादाब इरफान कुरेशी (४०), मुजफ्फर जफर पठाण (५२) आणि आदिल जफर पठाण (५८) अशी असून सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील विविध गावांतील रहिवासी आहेत.
पोलिसांनी या कारवाईत एकूण सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल, ज्यात कंटेनर व जनावरे समाविष्ट आहेत, असा जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१)(क)(घ)(ड)(च)(ज)(झ) सह भारतीय दंड संहिता कलम २८१, तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३०/१७७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर जनावरांची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षिततेसाठी नागपूर जिल्ह्यातील ‘औदुंबर गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, रुई खैरी’ या गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. राहुल इटेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात मनोज धात्रक, अमर लाखे, अमरदीप पाटील, धर्मेंद्र अकाली, प्रमोद पिसे, महादेव सानप, विनोद कापसे, अरविंद इंगोले, रितेश कुहाडकर, सुमेध शेंदरे, राहुल अदवाल आणि म.पो.अ. स्मिता महाजन यांनी सक्रिय सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.
















































