
वर्धा : देशातील तरुण पिढी आज व्यसनाच्या विळख्यात अडकली असून त्यांच्या आरोग्याबरोबरच आयुष्याचाही पाया हादरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ‘नशामुक्त भारत’ घडविण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने देशभरात ‘रन फॉर हेल्थ’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून वर्ध्यात रविवारी सकाळी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र गटांमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
‘जन-जन का एक ही नारा… नशा मुक्त हो देश हमारा…’ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी सहा वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. सोशालिस्ट चौक, वंजारी चौक, आर्वी नाका मार्गे पुन्हा शिवाजी चौक येथे समारोप झाला. स्पर्धकांसाठी प्रत्येक पॉईंटवर पाणी आणि एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती.
या मॅरेथॉनमध्ये १४ ते ४० वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. धावपटूंनी व्यसनमुक्तीचा संदेश देत आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना अनुक्रमे ५,००१, ३,००१ आणि २,००१ रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या मॅरेथॉनमधून तरुणाईने व्यसनमुक्तीचा संदेश देत ‘आरोग्यदायी भारत’ आणि ‘नशामुक्त समाज’ निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी म.भ.प. मयूर महाराज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाषजी राठी, स्वावलंब भारतचे अटलजी पांडे, विहिपचे जिल्हा मंत्री अनिलजी कावळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक महेश राऊत, जिल्हा प्रभारी मुन्ना यादव, विद्यार्थी प्रमुख अंबुज पांडे, सहसंयोजक अमोल अतकर, नगर संयोजक किरण उपाध्याय, विहिपचे उपाध्यक्ष संजय बडगेवार, सहमंत्री अरविंद कोकाटे, दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयोजक पुनम भोयर, नगर संयोजक अॅड. स्वाती दोडके व नगर विद्यार्थी प्रमुख राहुल शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

















































