जागतिक परिचारिका दिन; रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालणाऱ्या योद्धा! अडचणी, समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

राहुल खोब्रागडे

वर्धा : वैद्यकीय सेवा क्षेत्रात परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याशिवाय, या सेवेला पूर्णत्व मिळू शकत नाही. या सेवाकाळात त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वताच्या सुखदु:खाची, वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात. मात्र असे असूनही प्रत्यक्षात परिचारिकांकडे कायमच दुर्लक्ष केलेले दिसून येते. रुग्णसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या परिचारिकांना आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्याय चालू असलेल्या कोविड १९ या महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. मात्र अशा कठीण परिस्थितीत रुग्णालयात परिचारिका आपली सेवा देत आहे. बदलत्या काळाप्रमाणे समाजाला आरोग्य सेवा प्रदान करताना आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता जाणवू लागली आहे, त्याचप्रमाणे परिचारिकांना सोई सुविधा देण्याचीही आवश्यकता आहे.

बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम तळहातावर सुरिक्षत उचलून घेणारी परिचारिका असते. आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रु ग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. कोविडच्या पार्श्वभूमीवरही ती मागे हटलेली नाही. कोरोनाच्या निदानाने भयभीत झालेल्या रुग्णांवर मायेची फुंकर घालून, त्यांची सुश्रृषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच ठरली आहे.

कोरोनाबाधितांना सेवा देण्यात यांना कुठलीच भिती नाही. भिती आहे ती म्हणजे, तिच्यामुळे कुटुंबातील इतरांना आजाराची लागण होऊ नये याची. म्हणून ती खूप काळजी घेते. गुदमरून टाकणारे एन ९५ मास्क व प्लॅस्टिकच्या कव्हरने संपूर्ण अंग झाकून असलेली पीपीई किट सलग सात तास घालून राहते. या वेळात ती पाणी, भूख विसरलेली असते. रुग्णाना औषधोपचारच नाही तर त्यांना आजाराला घेऊन असलेली भिती दूर करण्याचा प्रयत्नही तिच करते.

रोज या लढाईत या सर्व जण उतरतात. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर स्वत:लाच होम क्वारंटाइनही करून घेतात. मुलांनाही त्या जवळ येऊ देत नाहीत. दूरूनच त्यांना पाहून, आपले अश्रू लपवून धीर देतात. पुन्हा सर्व विसरून दुसर्या दिवशी रुग्णालयात जातात. रोजचा हा संघर्ष त्यांचा सुरू आहे. प्रत्येक नात्यात व्यवहार शोधणार्या आजच्या काळात नोकरीही फारच व्यावसायिक पद्धतीने केली जाते. परंतु नोकरीचे काही क्षेत्र असे आहेत ज्याच्यात सेवेला नजरेआड करताच येत नाही. नर्सिंग हे त्यातलेच एक क्षेत्र आहे. या क्षेत्रात परिचारीका रूग्णाच्या केवळ जखमेवर मलमच लावत नाहीत तर मनावरच्या घावावर मायेची फुंकरही घालतात.

परिचारिका या शाखेला आपल्याकडे चांगली प्रतिष्ठा आहे, मात्र परिचारिकांच्या समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत. एकीकडे कामाचे वाढणारे तास, रुग्णांची सेवा करताना येणारा मानसिक ताण, असुरक्षितता तर दुसरीकडे स्वत:च्या कौटुंबिक जबाबदार्या अशा दुहेरी कसरतीच्या ओझ्याखाली परिचारिका त्यांचे जीवन व्यतित करत आहेत, देशात वाढती लोकसंख्या, सामाजिक-कौटुंबिक बदल, आजाराचे बदलते स्वरूप, वाढलेली आयुमर्यादा यामुळे रुग्णालये व परिचारिकांची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र सरकारी, निमसरकारी, खासगी, नर्सिग होम्स व पंचतारांकित सुपर स्पेशालिटी रुग्णालये या सर्व ठिकाणी परिचारिकांची संख्या मागणीपेक्षा खूपच कमी आहे. देशात जवळपास पाच लाख परिचारिका रुग्णसेवेचे कार्य करत आहेत. मात्र, रुग्णांच्या गरजेच्या तुलनेत ही संख्या तोडकी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here