
वर्धा : कोविडचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने देवळी विधानसभा क्षेत्रातील नाचणगाव येथे आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू केले. केंद्र सुरू करताना आमदार रणजित कांबळे यांना विचारणा न केल्याने आमदारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोनवरून संताप व्यक्त केला. या संभाषणात त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप जिल्ह्यात व्हायरल झाली असून, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी मेग्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना, राजपत्रित कर्मचारी संघटना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या वतीने पोलिसात तक्रार केली आहे. कांबळे यांच्यावर उद्यापर्यंत कारवाई झाली नाही, तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना काळात काम करणार नाही, अशी भूमिका आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. यावर पोलिस प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्या भागात कोरोना रुग्ण वाढत आहे त्या भागातील नागरिकांच्या चाचण्या करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला. त्यानुसार नाचणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी सुरू केली. याची माहिती आमदार रणजित कांबळे यांना मिळताच त्यांनी प्रारंभी येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. येथून त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांचे नाव कळताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना दूरध्वनी केला व लॉकडाउन असताना केंद्र सुरू करून राजकारण करता काय, माझ्या क्षेत्रात निर्णय घेताना मला विचारण्याची गरज नाही काय, अशी विचारणा करत थेट शिवीगाळ केली.
या प्रकरणी आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली असून त्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या कथित संभाषणाची क्लिप जिल्ह्यात व्हायरल झाली आहे. या क्पिलमध्ये आमदारांनी केंद्राबाबत त्यांना विचारले नसल्याबाबत रोष व्यक्त केल्याचे दिसत आहे. तर लॉकडाउन असताना या केंद्रांवर गर्दी होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.