गुप्तधनासाठी पायाळू मुले व पायवर मुलींचा शोध घेणारी टोळी सक्रीय! वर्ध्यातील पालक धास्तावले; अंनिसची रामनगर ठाण्यात तक्रार

वर्धा : जमिनीत दडलेले गुप्तधन शोधण्यासाठी पायवर असलेल्या मुलामुलींना शोधून त्यांना विविध प्रलोभन, खाद्यपदार्थांत गुंगीचे औषध देऊन, पैशाचे आमिष दाखवून पळवून नेत गुप्तधनाच्या आमिषाने त्यांचा बळी देणारा मांत्रिक व त्याच्या सहकाऱ्यांची टोळी शहरात सक्रिय झाल्याचे एका प्रकरणातून पुढे आले आहे. त्यामुळे त्या मांत्रिकाचा शोध घेत त्याला अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रारीतून केली आहे.

रमेश (नाव बदलेले) हा घराजवळील महाविद्यालयात बी.फार्म. दुस-या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचा मोबाईल क्रमांक त्याच्या मित्राकडून नरेश तेलरांधे याच्या सांगण्यावरून त्याच्या मुलाने मिळविला आणि गांधी मेमोरियल लेप्रोसी फाऊंडेशनमध्ये राहणाऱ्या मित्राला सोबत घेत ६ रोजी रमेश राहत असलेल्या घराजवळ जाऊन त्याला फोन करून बाहेर बोलाविले. त्याच्याशी जवळीक साधून तू पायवर आहे, तुझ्यामुळे गुप्तधन मिळू शकते, तुला स्वप्नात असे धन दिसते का, गुप्तधन लपलेले आहे, असा भास होतो का तू आम्हाला मदत कर, आमच्यासोबत चल तुला पैसे देवू.

आमच्या संपर्कात दिल्ली, मुंबई येथील खूप व्यक्ती संपर्कात आहे, असे सांगितले. मात्र, रमेशला काहीच न समजल्याने तेथून घरी निघून गेला. ही बाब त्याने त्याच्या आईला सांगितली. मुलाची आई घाबरल्याने तिने तत्काळ गजेंद्र सुरकार यांना ही बाब सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून याबाबत रामनगर ठाण्यात तक्रार दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here