

वाडी : ट्रकच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी आलेल्या तिघांनी ट्रकच्या सुट्याभागाची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत विचारणा करताच त्या तिघांनीही ट्रकमालकास मारहाण केली. यातील तिन्ही आरोपीस वाडी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण 5९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. उमाकांत शंकर चौधरी (५०, रा. वैष्णवमाता सोसायटी, महादेवनगर, वाडी), रवींद्र विजय यादव (५३) व संदीप रवींद्र यादव (१९) दोघेही रा. सुराबर्डी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अशोक मार्कंडेय शुक्ला (५०, रा. मंगलधाम सोसायटी, शाहू ले-आऊट, बाडी) यांच्याकडे एमएच-०४/सीयू-१०४३ क्रपांकाचा ट्रक आहे. या ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीतील उमाकांतला बोलावले होते.
उमाकांतने रवींद्र व संदीपच्या मदतीने दुरुस्तीला सुरुवात केली. या तिघांनीही त्या ट्रकमधील बॅटरी, मागचे दोन टायर व ताडपत्रीची परस्पर विल्हेवाट लावली.