…तर दुसरी लाटच उलटू शकते! मुख्यमंत्र्यांनी सांगितला डेल्टा अन् डेल्टा प्लसचा धोका

मुंबई : कोरोनाचा अद्याप धोका टळला असतानाच आता डेल्टा व्हायरसमुळे राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आपण गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट उलटू शकते, असा गंभीर इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका आज वाहतुकीसाठी खुली झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी जागवल्या. त्यानंतर, कोविड सेंटरच्या उद्घाटन समारंभात राज्यातील कोविडची परिस्थिती कथन केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना आपण केलात, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असे म्हणत आता आणखी खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचवले. औषधाची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता अशी तारेवरची कसरत करत दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, अद्यापही दुसरी लाट संपली नाही, ओसरली असली तरी ती एका जागी स्थिरावली आहे. ज्याप्रमाणे गर्दी होतेय, हे पाहता तिसरी लाट कधी येईल हे माहिती नाही. पण, धोका दुसरी लाट उलटेल का याचाच आहे, कारण जो विषाणू आहे दुसऱ्या लाटेचा त्याला डेल्टा म्हणतात. तर, आत जो नवीन विषाणू सापडत आहे, त्यास डेल्टा प्लस म्हणतात. डेल्टा प्लस अजून पसरलेला नाही, पण डेल्टाच राज्यात व देशात आपल्यावर हावी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जर गर्दी टाळली नाही तर दुसरी लाटच उलटू शकते, ओसरु नाही शकत तर उलटू शकते. त्यामुळेच, आजपासून आपण जे केलंय त्याचं महत्त्व नागरिकांच्या लक्षात येईल. दरम्यान, नागरिकांच्या काळजीपोटीच सरकार काम करत आहे, निर्णय घेत आहे. आज ज्या कोविड सेंटरचं उद्घाटन केलंय, ते असंच पडून राहावं. येथे दाखल होण्याची वेळ कुणावरही येऊ नये, राज्यातील नागरिक निरोगी आणि दिर्घायुष्यी राहो, अशा भावनिक शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here