तुमची एसटी कुठे आहे? एक क्लिक करा अन् मिळवा लोकेशन! तासंतास बसून वाट पाहण्याची कटकट संपणार

नागपूर : कोरोना संकटामुळे संपूर्ण जगात नैराश्‍याचे वातावरण असतानाच लालपरी मात्र स्मार्ट झाली आहे. नागपूर विभागातील सर्व बसेसना व्हीटीएस यंत्रणा (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) बसविण्यात आली आहे. यामुळे एसटीचे नेमके लोकेशन एका क्लीकवर कळणार आहे. त्यामुळे कधी येणार म्हणून तासंतास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट संपणार आहे.

राज्यातील गाव, वाड्या, वस्त्या, खेडे, तांड्यांना जोडणारी एसटी ग्रामस्थांसह शहरवासीयांच्या जीवनाशी निगडीत आहे. प्रवास लांब पल्ल्याचा असो अथवा जवळचा, सर्वसामान्य प्रवासी एसटीलाच प्राधान्य देतात. परंतु, पुढची फेरी नेमकी किती वाजता येणार याचा कोणताही अंदाज नसल्याने प्रवाशांची चांगलीच अडचण व्हायची. एसटीला उशीर झाल्यास बरेचदा प्रवासी पर्यायी व्यवस्थेचा उपयोग करायचे. तोटा वाढण्याचे हेही एक कारण आहे. यावर उपाय म्हणून एसटीने व्हीटीएस यंत्रणा बसमध्ये बसविली आणि ती मोबाईल ॲपशी जोडण्यात आली. ही संपूर्ण यंत्रणा कुठलाही गाजावाजा न करता कार्यान्वित करण्यात आली. त्याच्या मदतीने प्रवाशांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मोबाईलवरच मिळणे शक्य झाले आहे. रेल्वेप्रमाणेच एसटीची लाइव्ह माहिती प्रवाशांना मिळणार आहे. एवढेच नव्हे तर बस क्रमांकवरूनही लोकेशन मिळू शकणार आहे.

विभागातील ४५० बसेसना व्हीटीएस

नागपूर विभागाचा विचार केल्यास शहरातील चार व ग्रामीण भागातील चार असे एकूण आठ आगार असून ताफ्यात एकूण ४५० बसेस आहेत. या सर्व बसेसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. तसेच प्रवाशांच्या सोईसाठी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर तीन इलेक्ट्रॉनिक फलक लावले आहेत. ज्यामुळे लवकरच लागणाऱ्या बसेस, कोणत्या मार्गाने जाणार, बस सुटण्याची वेळ, विलंब होणार असल्यास अपेक्षित वेळ आदी माहिती फलकावर झळकू लागली आहे.

प्रशासनाचा वॉच –

व्हीटीएसमुळे अधिकाऱ्यांनाही बसेसवर वॉच ठेवणे एकाच ठिकाणावरून शक्य झाले आहे. बस सुटण्याची नेमकी वेळ, सध्या ती कुठे आहे, बसचा वेग (ओवर स्पिडिंग), बस एकाच ठिकाणी कितीवेळ उभी आहे, थांबा असूनही बस थांबली की नाही, बसचा पुढील थांब यासारखी माहिती रियल टाइम मिळणार आहे. यामुळे प्रशासनालाही नियोजन करणे सोईची होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here