

हिंगणघाट : शहरात आणि परिसरात गेल्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणात बोअरवेल (कुपनलिका) होत आहे. यामुळे जमिनीची चाळण होऊन पाण्याच्या पातळीत विलक्षण घट होताना दिसत आहे. या विषयावर नगर पालिकेचे लक्ष केन्द्रीत करण्याकरिता मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
ज्या प्रमाणात रोज शेकडो बोअरवेल होत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात पाण्याची समस्या गडद होताना दिसत आहे. यावर एकमात्र पर्याय रेन वाटर हार्वेस्टिंग असून नगर पालिका नियमावलीनुसार नवीन बांधकामांना हे सक्तीचे असूनही जल संधारण करण्यासंदर्भात नगर पालिका गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ज्या प्रमाणात ३०० ते ५०० फुट जमिनीखालून पाण्याचा उपसा होत आहे. त्याप्रमाणात पाणी भरणा होत नसल्याने गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. एका सर्वेक्षणानुसार वर्धा जिल्हयात पाण्याच्या पातळीत सुधारणा झाली असली तरी हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुका यामधे सर्वात पिछाडीवर आहे.
पर्यावरण पूरक घरांना सवलत द्या…
पर्यावरण पूरक घरांना घर करामधे सवलत देण्यासंदर्भातही पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतिने निवेदन देण्यात आले. “माझी वसुंधरा” उपक्रमांतर्गत वर्धा नगर पालिकेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे हिंगणघाट नगर पालिकेने घर परिसरात व बाहेर वृक्षारोपण, रेन वाटर हार्वेस्टिंग, सौर उर्जेवरील उपकरण, सायकलचा वापर, कचऱ्यापासून खत निर्मीती अशा प्रकारच्या पर्यावरण पूरक घरांना घर करामधे सूट देण्याचा उपक्रम राबविल्यास पर्यावरण पूरक घर निर्माण करण्याकडे जनता आकर्षीत होऊन शहर हिरवेगार आणि पाणीदार होण्यास मदत होईल. आणि ‘माझी वसुंधरा’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने साध्य होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले. यावेळी धनराज कुंभारे उपस्थित होते.