बोलेरो नदीत कोसळली; १ महिला ठार तर १२ प्रवासी जखमी

वर्धा, ता. ६ : मालवाहतूक करणारी बोलेरो गाडी सुरगाव मार्गे नागपूर येथून देवळीला जात असताना बाभूळगाव येथे नदीत कोसळली. या घटनेत गाडीमध्ये बसलेले 13 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार (ता. ६) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. गावकऱ्यांच्या सतर्कतेने 13 प्रवस्याना नदीमधून काढण्यात यश आले मात्र या अपघातात लक्ष्मी तानबाजी लोखंडे या वृद्ध महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नागपूर जिल्ह्यातील वाकी येथे दर्शनासाठी देवळी तालुक्यातील पडसगाव येथून मालवाहू गाडीने काही प्रवासी गेले होते. यात सुरगाव येथील काहींचा समावेश होता. दरम्यान परत येत असताना सेलू तालुक्यातील सुरगाव मार्गे देवळी तालुक्यात जात होते. सुरगाव येथे हर्षा पाटील, प्रेमीला पाटील, कमलाबाई मानकर यांना सुरगाव येथे उतरवून गाडी समोर निघाली होती. रस्त्यात बाभूळगाव येथे वाघाळा नदीवर असलेल्या पुलावरून बोलेरो गाडी खाली कोसडली. यात गावकऱ्यांच्या सतर्कतेने लागलीच मदतकार्य करण्यात आले. बोलेरो नदीत पलटी झाली. बाभूळगाव येथील गावकऱ्यांनी त्यांना शर्थीचे प्रयत्न करीत बाहेर काढले.

या वाहनात दोन वर्षांच्या मुलीसह म्हातारीचा देखील समावेश होता. चालक हेमंत पाटील, निकिता पाटील, देवू हेमंत पाटील, दादाराव हुडे, त्रिवेणी हुडे, ज्योती वडते, रेखा लोखंडे, गुड्डी लोखंडे, भीमा लोखंडे, लक्ष्मीबाई लोखंडे, छाया म्हस्के, चिऊ नगराळे, सागर सालोडकर सर्व राहणार पळसगव तालुका देवळी या तेरा जणांचा समावेश होता. प्रवस्याना आंबूलन्सने लगेच सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाभूळगाव येथील गावकऱ्यांनी लगेच सहकार्य केल्याने यात अनेकांचे प्राण वाचले असेच गावकरी सांगत आहे.

पुलाला नाही सुरक्षा कठडे…

सेलू ते येळाकेळी या मार्गावर हा अपघात झाले आहे. बाभुळगाव येथे झालेल्या या अपघाता दरम्यान गावकऱ्यांनी पुलाला कठडे बसल्याची बाब प्रकर्षाने मांडली आहे. या मार्गावर दोन पूल आहेत. सुरगाव आणि बाभूळगाव या दोन्ही ठिकाणी पुलाला कठडे नाहीत. कठडे नसल्याने गाडी नदीत सरळ गेली. पुलाला कठडे असते तर कदाचीत अपघात टळला असता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here