अखेर चौपदरीकरणात वृक्षतोड थांबली; पर्यावरण प्रेमींच्या प्रयत्नांना यश

-राहुल काशीकर
वर्धा : सेवाग्राम विकास आराखडयाअंतर्गत गांधी चौक ते सेवाग्राम दरम्यान होत असलेल्या चौपदरीकरणात वृक्षतोड थांबली आहे. झाडांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शक्य तेवढी झाडे वाचविण्याचा प्रयत्न हा सर्वेक्षणादरम्यान करण्यात येईल. तोपर्यंत झाडे तोडण्याचे काम थांबविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके यांनी दिली. यामुळे पर्यावरण प्रेमींच्या प्रयत्नांना यश आले आहे.

दत्तपूर ते नालवाडी, आरती चौक ते गांधी चौक ते सेवाग्राम हे 12 किलोमीटरचा या रस्त्याचे काँक्रीट चौपदरीकरणाचे काम मंजूर आहे. या 12 किलोमीटरच्या रस्त्याच्या बाजूला सुमारे 2 हजार 500 झाडे आहेत. मात्र, ही झाडे वाचविण्यात आली असून रस्त्याच्या मध्ये येणारी 170 झाडे काढणे आवश्यक आहे. यासाठी वनविभाग, सेवाग्राम आणि नालवाडी ग्रामपंचायत तसेच नगरपरिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.

झाडे काढत असताना पर्यावरणाच्या मुद्द्यावरून सेवाग्राम मधील काही नागरिकांनी चिपको आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यासह होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यात आला. यासंदर्भात कार्यकारी अभियंता गजानन टाके यांनी नागरिकांशी सतत तीन दिवस 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान बैठका घेऊन वृक्षतोड थांबवण्याची मागणी करण्यात आली.

यामध्ये रेल्वे उड्डाणपूल ते डॉक्टर्स कॉलनी दरम्यान पूर्णपणे पेविंग ब्लॉक लावून काही झाडे वाचविता येऊ शकतात का? याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. सद्यस्थितीत झाडे काढण्यास तात्पुरते स्थगिती देण्यात आली असून सर्वेक्षणानंतर शक्य तेवढी झाडे वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन गजानन टाके यांनी पर्यावरण प्रेमींना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here