पवनार-सेवाग्राम रस्त्यावर अपघातांचे सत्र कायम ; ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे नागरिक त्रस्त

पवनार : सेवाग्रामवरून पवनारकडे येणाऱ्या मुख्य मार्गावरील रेल्वे फाटकाजवळील पुलाखाली असलेल्या अंडरपासवर सुरू असलेल्या बांधकामामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने अपघातांचे सत्र थांबत नसून, मंगळवार (दि. १) रोजी दुपारी पुन्हा एकदा दुचाकीस्वार थेट खड्ड्यात गेल्याने दोघेजण जखमी झाले. ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.

रेल्वे गेट जवळील या अंडरपास बोगद्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र ठेकेदाराने येथे कोणतेही सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यातच या ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात या खड्ड्यांतील माती रस्त्यावर वाहून येते. परिणामी येथे नेहमीच चिखल व घसरडे वाळलेले मातीचे थर साचलेले असतात. त्यामुळे पाऊस पडला की हा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरतो.

याच खड्ड्यात मंगळवारी एक दुचाकी चालक थेट घसरून पडला. त्याच्यासह मागे बसलेली महिलासुद्धा रस्त्यावर आदळून दोघे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्यांना सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. दररोज शेकडो नागरिक या मार्गाने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाकडे जातात. अनेक रुग्णवाहिका व रुग्णही याच मार्गाचा वापर करतात. मात्र प्रशासनाची बेफिकीरी आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे येथे वारंवार अपघात होतात. या ठिकाणी पाणी बाहेर जाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. मोठमोठ्या भगदाडांमुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून ते थेट रस्त्यावर आपटतात.

स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी करूनदेखील कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानीवर नियंत्रण ठेवावे व तात्काळ रस्ता दुरुस्त करून, बांधकामस्थळी योग्य ती सूचना फलक लावावेत, नागरिकांच्या जीवावर बेतनारे हे अपघातात तात्काळ थांबावे अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here