वाहन परवान्याचे नूतनीकरण नसल्याने विमा नाकारला! मृत शिक्षकाच्या परिवाराला धक्का; विमा कंपनीविरोधात न्यायालयात दाद मागणार

वर्धा : अपघातात मृत पावलेल्या व्यक्‍तीने वाहन परवान्याचे नूतनीकरण केले नाही, या क्षुल्लक कारणाने मृत शिक्षकाचा 30 लाखांचा विमा प्रस्ताव मुंबईच्या विमा कंपनीने नाकारला. यामुळे त्या शिक्षकाच्या परिवाराला जबर धक्का बसला असून न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

मनोहर लोणकर हे के. टी. महाजन माध्यमिक विद्यालय, वडनेर, ता, हिंगणघाट येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. कार्यरत असतानाच दोन वर्षांपूर्वी ७ एप्रिल २०२० रोजी रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. मनोहर हे सेवेत असताना त्यांना बँक ऑफ इंडियाच्या वडनेर शाखेतून वेतन मिळत होते. वर्धा जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन जेव्हापासून बँक ऑफ इंडियामधून सुरू झाले तेव्हापासूनच बँकेने सॅलेरी पॅकेज योजनेंतर्गत काही योजना लागू केल्या.

त्या योजनेत अपघाताने मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी 30 लाख रुपयाच्या ‘ विमा संरक्षण योजनेचा ‘ समावेश होता. लोणकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काही वैद्यकीय देयके तयार करावे म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी वर्धा येथील वैद्यकीय देयकांचे अभ्यासक भास्कर भांगे यांच्याशी संपर्क साधून कोणत्या योजनेंतर्गत मदत मिळू शकते म्हणून मार्गदर्शन घेतले. भांगे यांनी लोणकर यांच्या कुटुंबीयांना बँकेच्या अपघात विमा योजनेतून 30 लाखांचा विमा संरक्षण लागू होऊ शकते असे सांगितले. तेव्हा कुटुंबीयांनी सर्व कागदपत्र तयार करुन अपघात योजनेचा प्रस्ताव तयार करुन बँक ऑफ इंडियाच्या वडनेर शाखेकडे सादर केला. प्रस्तावातील तरुट्या दुरुस्त करुन हा प्रस्ताव नागपूर शाखेमार्फत मुंबईच्या द न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनीकडे पाठविला. पण, अपघाताच्या वेळी लोणकर यांच्या वाहन परवान्याचे नूतनीकरण झाले नसल्याचे कारण कंपनीने देऊन प्रस्ताव नाकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here