कामगार घोटाळा! बनावट स्वाक्षरीचे ६३४ अर्ज दाखल! शासकीय कंत्राटदाराची पोलिसात तक्रार; दलालांवर कारवाई करण्याची मागणी

वर्धा : कामगार कार्यालयातील काही दलालांनी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयांतर्गत बांधकाम कामगार व मजुरांना मिळणाऱ्या योजनांसाठी चक्क जिल्हा परिषदेच्या शासकीय कंत्राटदाराच्या नावाचा वापर करून, त्यांचे बनावट शिक्के व स्वाक्षऱ्या मारून तब्बल ६५४ बोगस कामगारांचे अर्ज लाभ मिळण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात सादर केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.

कंत्राटदार भूषण सुधाकर अवचट (रा. त्रिमूर्तीनगर) यांनी याबाबतची लेखी तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात २ मे रोजी दाखल केली. कामगार कार्यालयांतर्गत शासनाकडून बांधकाम मजूर व कामगारांना साहित्य पेटी तसेच काही पैसे व विमा शासनाकडून कामगारांना दिला जातो. त्यासाठी मजूर, कामगारांना शासकीय कंत्राटदाराच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी, शिक्का व कामाचे ठिकाण आदी माहिती दिल्यावरच या योजनेचा लाभ दिला जातो. मात्र, काही दलालांनी शासनाची दिशाभूल करून कामगार आणि काही मजुरांकडून पैसे घेऊन बनावट दस्तावेज सादर करून शासकीय योजनांचा गैरवापर करीत असल्याचे दिसून येत आहे.

कंत्राटदार अवचट यांना सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी फोन करून ५० च्या वर बांधकाम कामगारांच्या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्याबाबतचे पत्र मिळाले. तसेच त्यांना कामगार कार्यालयात बोलाविण्यात आले. अवचट यांनी कार्यालयात जात दस्तावेज सादर करून शहानिशा केली असता, त्यांच्या नावाने एक नव्हे, तर तब्बल ६३४ बनावट अर्ज सादर केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून दोषी दलालांवर कारवाई करावी आणि ही फसवणूक तत्काळ थांबवून शासकीय योजनांचा गैरवापर थांबवावा, अशी लेखी तक्रार कंत्राटदार भूषण अवचट यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here