

वडनेर : पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी दुर्योधन कोल्हे यांचा पगार व थकबाकी असे मिळून १६ लाख ६३ हजार ८०७ आणि त्याच्या व्याजापोटी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांनी स्थानिक नगरपालिकेविरुद्ध जंगम जप्ती वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहे. दुर्योधन कोल्हे १९९५ पासून हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ३० ऑक्टोबर २०१४ रोजी औद्योगिक न्यायालयाने त्यांना कायम करण्याचे व त्यानुसार वेतन देण्याचे आदेश दिले होते. मात्र, पालिकेने आदेशानुसार कारवाई केली नाही. यानंतर कोल्हे यांची वर्धा नगरपालिकेत ४ सप्टेंबर २०१९ रोजी शासकीय आदेशाने लिपिक म्हणून नियुक्ती झाली. कोल्हे ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले.
त्यानंतर कोल्हे यांनी कामभार न्यायालयात खटला दाखल करून पगार व थकबाकीची मागणी केली. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोल्हे यांची थकबाकीचे २००१ रुपये हिंगणघाट नगरपालिकेला दिली. १६ लाख ६३ हजार ८०७ त्यांना देण्याचे आदेश दिले. मात्र, पालिकेने या आदेशालाही केराची टोपली दाखविली. त्यामुळे कोल्हे यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हिंगणघाट यांच्याकडे विशेष अर्ज अड. इब्राहिम हबीब बक्श यांच्यामार्फत दाखल केला. न्यायालयाने पालिकेला नोटीस पाठवून रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. या आदेशाकडेही पालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे न्यायालयाने नगर पालिकेविरुद्ध १६ लाख ६३ हजार ८०७ रुपयांच्या वसुलीसाठी जंगम जप्ती वॉरंट जारी केले. आदेशान्वये पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे वाहन, अग्निशमन दलाचे वाहन, पालिकेची अन्य वाहने जप्त करून त्याचा लिलाव करता येणार आहे. कोल्हे यांच्याकडून अँड. इब्राहिम हबीब बक्श यांनी न्यायालयात बाजू मांडली.