
वर्धा : भरधाव जाणाऱ्या मालवाहू चालकाला अचानक झोपेची डूलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून त्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागाहून जबर धडक दिली. यात मालवाहू चालकाचा जागीच मृत्यू झाला तर वाहक गंभीर असून उभ्या ट्रकचाही चालक जखमी झाला. ही घटना समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉर मधील येळाकेळी परिसरात शनिवारी सकाळी पावणेसात वाजता घडली.
शेख हुसेन शेख अनिज (३९ रा. चपराशीपुरा अमरावती) असे मृताचे नाव आहे. शेख हुसेन शेख अनिस (3८ रा. अमरावती) हा गंभ्रीर जखमी असून ट्रक चालक मोहम्मद आशिफ पठाण रा. जौनपूर उत्तर प्रदेश हा किरकोळ जखमी झाला. शेख अनिज हा एमएच 3२ डीटी ०३०3 क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथून नागपूरकडे जात होता. समृद्धी महामार्गावर अचानक त्याला झोपेची डूलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन अनियंत्रित होऊन ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या यूपी ७० पीटी ७७७१ क्रमांकाच्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात शेख अजीन हा जागीच ठार झाला तर, त्याचा सहकारी शेख अनिस हा गंभीर जखमी झाला. यासोबतच उभ्या ट्रकचा चालक मोहम्मद पठाण हाही जखमी झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर तातडीने पोलिसांनी धात घेतली.
समृद्धी महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी झाले दाखल
अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रमोद धोटे आपल्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी पोहोचले. तातडीने रु’णवाहिका बोलावून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास ते करीत आहे.

















































