भरधाव कार अनियंत्रित! मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने पादचारी शेतकऱ्यास चिरडले; चौघे जंगलाच्या दिशेने झाले पसार

कारंजा (घाडगे) : वाढदिवसाची पार्टी आटोपून मद्यधुंद अवस्थेत कारने भरधाव जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने शेतातून पायदळ घराकडे निघालेल्या शेतकऱ्यास चिरडले. यात पादचारी शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी आहे. ही घटना कारंजा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राजनी पेट्रोल पंपजवळ बुधवारी रात्री साडेसात वाजता दरम्यान घडली. कार मधील चौघेही कारंजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असल्याची गावात चर्चा आहे.

साहेबराव धुर्वे (५०) रा. राजनी, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कारंजा पोलीस स्टेशनचा कर्मचारी पवन लव्हाळे याचा बुधवारी वाढदिवस होता. त्या निमित्ताने तळेगावकडील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टी आटोपून चौघेही एम. एच. 3२ ए. एच. ४००६ क्रमांकाच्या कारमध्ये बसून कारंजाकडे निघाले. या मार्गारील राजनी येथील पेट्रोलपंपसमोर मद्यधुंद पोलीस कर्मचारी पवन लव्हाळे याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शेतातून घराकडे जाणाऱ्या साहेबराव धुर्वे या शेतकऱ्याला जबर धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, कार अमरावतीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूने राजनी आवाकडे सायकलने जाणाऱ्या प्रमोद परतेती याला धडक देऊन रस्त्याच्या खाली कोसळली. प्रमोद हा गवंडी कामगार असून, तो या धडकेत गंभीर जखमी झाला.

मृत साहेबराव हे राजनी येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या नर्सरीमध्ये पाच वर्षांपासून काम करतात. सायंकाळी काम आटोपल्यानंतर स्वतःच्या शेतात कापूस वेचणी सुरू असल्याने मुलाला मदत करण्याकरिता ते. शेतात गेले. मुलाच्या गाडीवर कापसाचे गाठोडे बांधून देऊन तू घरी कापूस टाकून घ्यायला परत ये, असे सांगितले. तोपर्यंत ते पायी चालत राष्ट्रीय महामार्गावर येऊन पोहोचले असता, पवन लव्हाळे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरधाव कारने त्यांना चिरडले.

त्यांचा मुलगा आशिष घेण्यासाठी परत आला तेव्हा वडील त्याला गंभीर अवस्थेत पडून दिसले. त्यांना तत्काळ कारंजा ग्रामीण रुणालयात दाखल केले तर डॉक्टरांनी मृत घोषित केले. आशिषने कारचालक पवन व इतर तिघांना या अपघाताबाबत विचारणा केली असता चौघांनीही आशिषला मारहाण केली. इतकेच नाही तर गंभीर जखमी असलेल्या प्रमोद परतेती याला लाथाबुक्क्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात आले.

या घटनेमुळे राजनी गावातील नागरिकांनी तीव्र रोष व्यक्‍त करून कारंजा पोलीस स्टेशन गाठले. चारही पोलीस कर्मचाऱ्यांना त्वरित अटक करा किंवा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी लावून धरली. नागरिकांच्या आक्रमक पवित्रा लक्षात येताच चौघांनीही जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. कुणालाही ताब्यात घेतले नसल्याने उर्वरित तिघांचे नावे कळू शकली नाहीत. हे तिघेही कारंजा पोलीस स्टेशनचेच कर्मचारी असल्याचे गावकऱयांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here