
वर्धा : दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रवींद्र कोटंबकार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात तब्बल १० दिवसानंतर पोलिसांनी आरोपीला औरंगाबाद येथील करमाळा येथून अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता ४ मे पर्यंत पोलीस कोठाडीत ठेवण्याचा आदेश दिला.
रजत उर्फ लाला तभाणे (४०) रा. नागपूर असे अटक आरोपीचे नाव आहे. १९ एप्रिल रोजी दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रवींद्र कोटंबकार यांच्यावर हल्ला झाला होता. यात ते गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. घटनेच्या १० दिवसानंतर या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
आरोपी लाला याच्यावर नागपूरसह अनेक पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या दिवसापासून आरोपी फरार होता. माहितीच्या आधारे पोलिसांनी करमाळा येथे जाऊन आरोपीला रात्री अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता आरोपी लाला याला ४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश वर्धा न्यायालयाने दिला. उर्वरित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.




























































