
नागपूर : क्षुल्लक कारणावरून महिला व तिच्या दोन मुलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. जयभीमनगर येथील रहिवासी १९ वर्षीय तरुण रंगारी रविवारी दुपारी घरासमोर उभा होता. त्याचवेळी तरुणचा मित्र प्रतीक खोब्रागडे (२१, रा. कौशल्यानगर) तेथे आला. त्यांच्यात प्रारंभी क्षुल्लक वाद झाला आणि नंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. दरम्यान, तरुणच्या हाताला असलेल्या कड्यामुळे प्रतीकच्या डोक्याला जखम झाली.
प्रतीक तेथून निघून गेला आणि काही वेळाने तो रितिक खोब्रागडे या आपल्या भावासह परतला. त्यावेळी तरुणचा भाऊ साहिल पलंगावर झोपला होता. रितिकने छातीत चाकू भोसकून साहिलला जखमी केले आणि तरुणवर हल्ला चढवून त्यालाही जखमी केले.
मुलांवर जीवघेणा हल्ला होत असल्याचे बघून त्यांची आई मधात आली. तेव्हा खोब्रागडे बंधूंनी तिलाही जखमी केले. अजनी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
















































