विळा, कोयता घेऊन तिघांचा घरावर हल्ला! देवतारे लेआऊट येथील घटना; परिसरात दहशत

सेलू : प्रभागात दहशत निर्माण व्हावी, या उद्देशाने गावगुंडांनी हातात विळा कोयता घेऊन एका घरावर हल्ला चढविला. हातात शस्त्र आणि शिविगाळ केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. ही घटना शहरातील देवतारे लेआउट येथे कलीम शेख यांच्या घरी घडली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून तिघांविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील प्रभाग क्रमांक चार कोतीवाडाची अति संवेदनशील म्हणून ओळख आहे. त्या परिसरात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या ठिकाणी काही दिवसांपासून नागपूर येथील बाबू शेख नामक व्यक्‍ती वास्तव्यास आहे. तो परिसरात दहशत निर्माण करून आपला जम बसविण्याचा प्रयत्न करीत आहे. रविवारी रात्री त्याने कोतीवाडा येथील शिवा देवरे व उदय देवरे यांना दारू पाजून सोबत घेत हातात कोयता व विळा घेऊन देवतारे लेआऊट येथे कलीम शेख यांच्या घरावर हल्ला केला. प्रसंगावधाने कोणालाही इजा झाली नाही. या प्रकरणाची तक्रार सेलू पोलिसात करण्यात आली आहे. कोतीबाडा परिसरात काही बाहेरून आलेली मंडळी अवैध व्यवसाय चालविण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकाराने परिसरात गॅगवार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पोलिसांनी वेळीच लक्ष घालून समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करीत आळा घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here