


पवनार : गावाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासात मोलाचा वाटा असलेल्या वाचनालयाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. वाचनालयामध्ये सध्या वीज व्यवस्था नाही, साफसफाईचा अभाव आहे आणि मूलभूत सुविधांचा घोर तुटवडा जाणवतो. परिणामी, गावातील विद्यार्थी अभ्यासासाठी वर्धा शहरातील वाचनालयांमध्ये जावे लागत आहे. जिथे त्यांना वाचनाचा आर्थिक मोबदला भरावा लागतो. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच अभ्यासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आज निवेदन सादर करण्यात आले.
पवनार येथील ग्रामविकास अधिकारी यांना वाचनालयाच्या देखभाल, स्वच्छता आणि वीज पुरवठ्याच्या दृष्टीने सुधारणा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले. हे निवेदन विशाल नगराळे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत लिपिक राजूभाऊ उराडे यांच्या सुपूर्द करण्यात आले. यावेळी समाजिक कार्यकर्ते बार्शीरामजी मानोले, अक्षय कडू, गौरव खेलकर यांची उपस्थिती होती. गावातील अभ्यासू विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, वाचनसंस्कृती वाढावी आणि सार्वजनिक साधनसंपत्तीचा योग्य वापर व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.