

पवनार : सेवाग्रामहून पावनारकडे जाणाऱ्या मार्गावर, रेल्वे फटक्याजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या भुयारी पुलालगत सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे अपघात होण्याचा धोका सतत घोंगावत आहे.
सदर भुयारी पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असले तरी, त्यालगत अजूनही काही संरचनात्मक कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी पुलाच्या बाजूला खोल खड्डा खणण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी ना कोणताही सूचना फलक लावण्यात आलेला आहे, ना बॅरिकेट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी चालविणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज न आल्यास थेट अपघात होण्याची शक्यता आहे.
या मार्गाचा वापर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात जाण्याकरिता रुग्ण, ॲम्बुलन्स, रुंनासाठी भेटीला जाणारे नातेवाईक तसेच ग्रामीण भागातील अनेक दुचाकीस्वार, शेतकरी आणि व्यापारी दररोज करत असतात. रात्रीच्या अंधारात या अरुंद भुयारी पुलातून जाताना समोर काहीही न दिसल्यास वाहन थेट खड्ड्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने कामे चालवली जात असून सार्वजनिक सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तत्काल उपाययोजना करण्याची मागणी…
या ठिकाणी योग्य प्रकारचे बॅरिकेट्स, चेतावनी फलक, आणि रात्रीसाठी लक्षवेधी दिव्यांची तातडीने व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक प्रशासनाने व रेल्वे विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा एखादा दुर्दैवी अपघात घडल्यास याची सर्व जबाबदारी याच विभागाची राहील.