वर्ध्यात बेरोजगार तरुणांचा आक्रोश! कंत्राटी पदभरतीचा विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

वर्धा : महाराष्ट्र शासनाने कंत्राटी पदभरतीचा आदेश काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या बेरोजगार युककांची गळचेपी केली आहे. शासनाने भावी पिढी उद्‌ध्वस्त करण्याचे पडयंत्र रचल्याने याच्या विरोधात स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती, स्पर्धा परीक्षा बेरोजगार संघर्ष समिती आणि सामाजिक व राजकीय संघटनांनी संयुक्तरीत्या आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्वालयावर धडक दिली.

बहुजनांची मुलं आता कुठे प्रशासकीय व्यवस्थेत आपला ठसा उमटवीत असताना वर्ग २, 3 व वर्ग ४ च्या १८६ संवर्गातील सर्व पदे राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणतात, की एका सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात तिघांना काम मिळू शकते. तर मग एका आमदाराच्या पगारात ५ मुले कायमस्वरूपी काम करू शकतात आणि मंत्र्यांच्या महिन्याच्या प्रशासकीय ताफ्यावर होणाऱ्या खर्चात २० मुलं काम करू शकतात, असे प्रश्‍न आंदोलनादरम्यान सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आले. शासानाने तातडीने हा आदेश रद्द करावा, अन्यथा आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला.

२७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. गांधी जयंतीला सर्व आंदोलनकर्ते आश्रमात दोन तासांचे मौनव्रत करणार आहेत. शहरातून निघालेला बेरोजगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन नितेश कराळे, विशाल चौधरी, इंद्रजित वाघमारे, अमित कावडकर, अँड. गुरुराज राऊत, शिवाजी चौधरी, निहाल पांडे, गोविंद पारिसे, सागर चौधरी, शुभम नासारे, विवेक कोडपेल्ली, रोशन वांदीले, रोहन आदीवार, सादिया शेख यांच्यासह युवक, युवती उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here