

हिंगणी : नजीकच्या धामणगाव येथील रहिवासी असलेल्या मुन्ना ताराचंद पारधी (४५) याचा मृतदेह हिंगणी येथील मनोज मुडे यांच्या छतावर आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. मुन्ना याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
मनोज मुडे हे गावातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहतात. मृत मुन्ना पारधी हे त्यांचे चांगले मित्र असून ते मनोज यांच्या घरी नेहमीच यायचे. मनोज हा एकटा राहत असल्याने तो घराच्या दाराला कुलूप लावत नसे. मनोज हा सोमवारी घर उघडे ठेवून शेताकडे निघून गेला. मुन्ना पारधी याला मिरगीचा आजार असून तो मनोज याच्या घरी केव्हा आला तसेच तो छतावर कसा गेला याची कुणालाच कल्पना नव्हती. पण मनोज यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांना मनोजच्या छतावर कुणी इसम पडून असल्याचे दिसल्याने त्यांनी याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.
त्यानंतर घटनेची माहिती पोलीस पाटलाला देण्यात आली. त्यांनी सेलू पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे, गजानन कंगाले, ज्ञानेश्वर खैरकार व रन्नाकर कोकाटे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताव्यात घेत पंचनामा केला. शिवाय पंचनाम्या अंती मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. मुन्ना यांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नसून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.