

समुद्रपूर : झोपेची डुलकी आल्याने वाहनचालकाचे मालवाहू वाहनावरील नियंत्रण सुटले. अश्यातच वाहनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन ट्रेलरवर धडकले. यात क्लीनरचा मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास जाम शिवारात घडली. दुर्वास सखाराम शेंडे (४८) रा. चंद्रमनीनगर, नागपूर असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, झोपेची डुलकी आल्याने चालक दिलीप जोशेफ रा. नागपूर याचे एम.एच.४० बी.जी. २७७१ क्रमांकाच्या मालवाहनावरून नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना मालवाहू वाहन एम. एच. ४० बी. जी. ६२२८ क्रमांकाच्या ट्रेलरवर धडकले, यात क्लीनर दर्वास शेंडे याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, राजेंद्र बेले, भारत पिसुट्ठे, आश्रिष धमाने, अजय बेले, प्रदीप डोंगरे, सुनील श्रीनाथे, गणेश पवार यांनी घटनास्थळ गाठून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.