
वर्धा : सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर ठरावानुसार नागरिकांना १५८ आबादीसाठी राखीव असलेल्या जागेवर भूखंड पाडून वाटपाची कार्यवाही तत्काळ करावी, अन्यथा रहिवासी महिला सामूहिक आत्मदहन करेल, असा थेट इशारा समता सैनिक दलाचे प्रदीप कांबळे, जयबुद्ध लोहकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.
सिंदी(मेघे)त सर्वे क्रमांक १५८ येथे राहणारे रहिवासी रोजमजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह. करून उपजीविका चालवितात. त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून तट्ट्याबोऱ्याचे झोपडे बांधून कुटुंबासह राहतात. ही जागा त्यांना मिळण्यासाठी अनेकदा शासनासोबत पत्रव्यवहार झाला. ग्रा. पं.ने नागरिकांना घर बांधण्यासाठी भूखंड मिळण्याबाबतच्या अर्जाची दखल घेत ठराव मंजूर करून ठरावाची प्रतही शासनाकडे दिली. मात्र, प्रकरण अजूनही प्रलंबित आहे.
लॉकडाऊन काळात आमच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा बिकट परिस्थितीत जर जबरदस्तीने आमच्या झोपड्या हटविल्या तर ज्या ठिकाणी आम्ही झोपड्या बांधून राहात आहोत, त्याच ठिकाणी आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना पप्पू पाटील, रोशन कांबळे, चंदू भगत, अमोल वंजारी, अश्विनी गजभिये, रमा गजभिये, सीमा रामटेके, मुन्नी मेश्राम, उषा मरसकोल्हे, सुषमा मरापे, प्रतिभा मून, मीना रामटेके, विद्या कोवे, दीपाली इंगोले, चंद्रकला पखाले, लीला शिरसाम, सुमन फुलझेले, वंदना वासनिक, वंदना फुलझेले, प्रीती शिंगणापूर, दीपा घाटे आदींसह नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

















































