
वर्धा : आदिवासी बांधवाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या अनेक महत्वाकांशी योजना आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक आदिसावी बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी आदिवासी बांधवाची जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये जाऊन तेथे शिबिरे घ्या व त्यांना योजना समजावून सांगा, असे आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
तालुक्यातील वागदरा या आदिवासी गावात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गावक-यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आदिवासी बांधवांशी संवाद साधतांना श्री तनपुरे बोलत होते. यावेळी माजी आमदार राजु तिमांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनिल राऊत, पंचायत समितीचे उपसभापती संदिप किटे, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ, राजाभाऊ ताकसांडे, सरपंच रामचद्र नागोसे, माजी जि.प. सदस्य पांडुरंग कोडापे, महेंद्र शिंदे आदी उपस्थिती होते.
आदिवासी विकास विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आदिवासी भागात जाऊन समाजाच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. योजना भरपूर आहे. त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे श्री. तनपुरे म्हणाले. विभागाच्या वतीने व्यवसायासाठी भागभांडवल उपलब्ध करुन दिले जाते. व्यवसायासाठी उत्सुक असलेल्या तरुणांनी यासाठी आपले अर्ज दयावे असेही पुढे बोलतांन ते म्हणाले.
विभागाच्या वतीने खावटी योजने अंतर्गल लाभ दिला जातो. योग्य लाभार्थ्यांनाच हा लाभ दिला जावा. सौर पंपासाठी शेतक-यांची एकत्रित मागणी असल्यास या योजनेचा लाभ उपलब्ध करुन देऊ, असे त्यांनी सांगितले. सुरवातीस बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. काही लाभार्थ्यांना उद्योगासाठी अर्थसहाय्याचे वितरण व माजी सैनिकाच्या कुटूंबाचा सत्कार करण्यात आला. सुरवातीस प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांनी प्रकल्पा विषयी माहिती दिली. यावेळी गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


















































