जि.प. प्रशासनाचे दुर्लक्ष! मिनी मंत्रालयात रात्रीस खेळ चाले; दारूचे वाहताहेत पाट: कारवाई करणार तरी कोण?

वर्धा : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या आवारात खुलेआम दारू रिचवल्या जात असल्याचे परिसरात मिळून आलेल्या दारूच्या बाटल्यांच्या खचावरून दिसून येते. जि.प.च्या आवारात दारू रिचवणारे ते कोण, असा प्रश्न उपस्थित होत असून याकडे कुण्याही बड्या अधिकाऱ्याचे लक्ष नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी तालुकास्तरावरून नागरिक येत असतात. मात्र, या परिसराचा फेरफटका मारला असता मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आला. त्यामुळे कार्यालयात काम करणारे अधिकारी, पदाधिकारी तर रात्रीच्या सुमारास दारू रिचवत नसतील ना, असा प्रश्न सहज उपस्थित होतो आहे.

याकडे मात्र, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर तत्काळ आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी देखील जिल्हा परिषदेच्या परिसरात दारुच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे कार्यालयीन वेळेत तर दारुचे घोट रिचविल्या जात नसेल ना, असा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here