रेमडीसिवीर औषध कोरोनावरील उपचारासाठी प्रभावशाली नाही – डॉ. कलंत्री

वर्धा : राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून रेमेडिसीवीर हे या आजारावरील एकमेव रामबाण औषध आहे असा समज जनता आणि वैद्यकीय क्षेत्रात पसरलेला आहे. मात्र, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयाचे मेडिसिन विभागाचे प्रोफेसर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री यांच्या म्हणण्यानुसार रेमडीसीविर या इंजेक्शनमुळे रुग्ण बरा होतो, गंभीर रुग्णांचा मृत्यू होत नाही किंवा फुफ्फुसातील संसर्ग कमी करतो, हा जनतेमधील समज चुकीचा आहे. त्यामुळे, नागरिकांनी या औषधासाठी अट्टहास करू नये, वैद्यकीय क्षेत्रात इतरही औषधे यापेक्षा उपयुक्त ठरत आहेत, त्यामुळे नागरिकांनी रेमडीसीविर मिळत नाही म्हणून भयभीत होऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

डॉ कलंत्री हे ४० वर्षांपासून सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मेडिसीन विभागात कार्यरत आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा कोरोनासाठी उपयोग होत नाही, यावर त्यांचा संशोधनपर निबंध लँसेट या सुप्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाला आहे. आता, त्यांनी पुन्हा रेमेडिसीवीर या इंजेक्शनचा सुद्धा कोरोना रुग्णांचा मृत्युदर कमी करणे, रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे, किंवा आय सी यु मधील रुग्णाचे दिवस कमी करणे, फुफ्फुसातील संसर्ग थांबविणे यापैकी कोणत्याही कारणासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे संशोधनाअंती म्हटले आहे.

जगातल्या २८ देशांमध्ये झालेल्या संशोधानातून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा रेमडिसीविर उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. डब्लू एच ओ ने २८ देशातल्या ७४३३ कोरोना बधितांवर संशोधन केले. यातील काही रुग्णांना रेमडीसीविर दिले आणि काही रुग्णांवर इतर औषधांनी उपचार केले असता रेमेडिसीविर औषधाचा फारसा उपयोग होत नसल्याचे सिद्ध झाले असल्याचेही कलंत्री यांनी सांगितले. मात्र, सोशल मीडियाने या औषधाबद्दल समाजात एक प्रकारचा गैरसमज पसरविला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि रेमडीसीविर मिळत नाही म्हणजे आता मृत्यू अटळ आहे हा भ्रम लोकांमध्ये तयार होणे हे भीतीदायक आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांवर रेमडीसीविर देण्यासाठी दबाव आणतात. कोणत्याही परिस्तितीत उपयुक्त न ठरणाऱ्या अशा औषधाचा आग्रह धरणे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

रेमडीसीविर शिवाय डॉक्टरांकडे अशी अनेक औषधे आहेत, ज्यामुळे कोविड रुग्ण पूर्ण बरा होतो. सेवाग्राम रुग्णालयात अनेक वृद्ध रुग्णसुद्धा रेमडीसीविरचा उपयोग न करता पूर्णपणे बरे केले आहेत. डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानाचा, वैद्यकीय संशोधनाचा आणि वैद्यकीय कौशल्याचा उपयोग करून काम करू द्यावे, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here