

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सावधगिरी म्हणून बॅंकांच्या वेळा बदलविल्या आहेत. या बदललेल्या वेळेनुसार बॅंका आता सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. यामुळे नागरिकांची सध्या बॅंकांत गर्दी होत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक बॅंकांतील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचे पुढे आले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून बॅंक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने निर्णय घेत बॅंकांचा कालावधी कमी केला आहे. यामुळे नागरिकांना त्यांचे व्यवहार करण्याकरिता त्रास होत असल्याचे दिसून आले.
बऱ्याच दिवसांच्या सुटीनंतर आज सकाळी बॅंकांचे कामकाज सुरू झाले. यात बॅंकेत गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना बॅंकेच्या द्वारावर अडवून एकाएकाने बाहेर सोडण्यात आले. यामुळे बाहेर चांगल्याच रांगा लागल्या होत्या. ग्राहकांना बाहेर थांबण्यास सांगण्यापूर्वी त्यांच्याकरिता येथे व्यवस्था करणे ही बॅंक प्रशासनाची जबाबदारी होती.
परंतु वर्ध्यात तसे काहीच झाले नसल्याचे दिसून आले आहे. बॅंकेच्या आत जरी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रयत्न असला तरी बाहेर या नियमांच्या पुरत्या चिंध्या झाल्याचे दिसत होते.