सिंदी (रेल्वे) सर्कलमधील ३९ हेक्टरात सोयाबीनला शेंगाच नाही! महाबीजसह ईगल कंपनीने लुबाडल्याची ओरड; सोमवारी होणार पुन्हा शेतांची पाहणी

संजय धोंगडे

सेलू : यंदाच्या हंगामात ज्या शेतकर्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे वापरले त्यांचे भले झाले. पण महागडे व दर्जेदार बियाणे वापरले त्यांच्या शेतातील वाढलेल्या सोयाबीनला एकही शेंग धरली नाही, अशा अनेक तक्रारी आहे. शनिवारी दुपारी किसना वरघणे यांच्या शेताला कृषी अधिकारी उमेश येंडे यानी भेट दिली असता बियाणे बोगस असल्याचा अभिप्राय नोंदवला आहे. ‌
यावर्षी कमी खर्चात व अंग मेहनतीने भक्कम उत्पादन येईल या आशेने अनेक शेतकर्यांनी सोयाबीनला अग्रक्रम दिला. नियोजित वेळेत पेरणी झाली पीक जोमाने वाढत गेले पण सर्व प्रकारच्या संगोपनानंतरही सोयाबीनला शेंगाच पकडल्या नाहीत. हे लक्षात आल्यावर सर्वत्र हलकल्लोळ मचला दिग्रज येथील प्रगतीशील शेतकरी किसना वरघणे यांनी यंदा महाबीज कंपनीच्या १६२ नंबरच्या बियाण्याची निवड केली आहे. राज्य सरकारच्या या बियाणे कंपनीने नाडवले, अशी तक्रार किसनाजींनी स्थानिक कृषी अधिकारी यांच्याकडे केली. त्यांच्या तक्रारीवरुन उमेश येंडे या अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी केली व बियाणे सदोष असल्याचा शेरा दिला.
असाच प्रकार रमेश तळवेकर रा. सिंदी रेल्वे यांचेशी घडला. त्यांनी ईगल कंपनीचे ३३५ नंबरचे सोयाबीन बियाणे वापरले, पण त्यांचे चार एकरातील शेतात एक शेंग सोयाबीनला दिसून आली नाही. परिसरात या फसवणुकीची चर्चा रंगत असतांनाच इतरही शेतकर्यांनी कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दिल्याचे समजते. श्री येंडे यांनी सोमवारी कंपनीचे अधिकारी व तज्ज्ञ मंडळी शेताची पाहणी करून अभिप्राय देतील असे सांगितले आहे. या भागात किमान १८ हजार हेक्टर पेक्षा जादा क्षेत्रफळात सोयाबीन पेरण्यात आले आहे. कपाशीची झपाट्याने वाढ झाली पण, पर्हाटीला सुध्दा पाहीजे त्या प्रमाणात बोंड दिसत नाही, अशीपण ओरड सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here