जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सेवेसाठी ‘संवाद कक्ष’! तक्रारींवर कार्यवाहीचे विभागप्रमुखांना निर्देश; संवाद कक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते उद्घाटन

वर्धा : जिल्ह्यातील नागरिकांच्या आपल्या समस्या, तक्रारी मांडता याव्या यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याहस्ते आज झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) नितीन पाटील, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, तहसिलदार रमेश कोळपे, विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, तक्रारी किंवा समस्या असतात. त्यांना आपल्या समस्या योग्य ठिकाणी मांडून त्याचे निराकरण करून घेणे आवश्यक असते. त्यांना आपल्या तक्रारी एकाच ठिकाणी मांडता याव्यात आणि त्याच्यावर योग्य प्रकारची कार्यवाही व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद कक्ष सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरीक या कक्षातील 1800 2332 383 या क्रमांकाच्या हेल्पलाईनवर दुरध्वनी करून आपली तक्रार सादर करु शकतात.

कक्षात नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांकडून त्याची नोंद केली जाते. कक्षातील कर्मचाऱ्यांच्यास्तरावर तक्रारीचे निराकरण होणे शक्य असल्यास तेथेच निराकरण केले जातील. तक्रार इतर विभागाशी संबंधित असल्यास त्या विभागास ती तक्रार वर्ग केली जातील आणि विभागास कालमर्यादेत त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश संवाद कक्षाच्यावतीने दिले जातील. संवाद कक्षास प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांनी उद्घाटनाच्या दिवशीच सर्व विभाग प्रमुखांना लेखी स्वरूपात दिले आहे.

संवाद कक्षास प्राप्त तक्रारींचे प्रत्येक आठवड्यात विश्लेषण केले जाणार आहे. आठवड्याला किती तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यापैकी किती निकाली निघाल्या याचा आढावा स्वत: जिल्हाधिकारी घेणार आहेत. ज्या विभागांकडे जास्त तक्रारी प्रलंबित दिसतील, त्या विभागाच्या प्रमुखांना स्वत: जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here