राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन! प्रस्ताव सादर करण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत

वर्धा : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दिले जातात. सन 2021 च्या या पुरस्कारांसाठी दि. 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांचा समावेश असावा. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीयस्तर पुरस्कार आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत.

उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. समाजमाध्य पुरस्कार ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. केंद्र शासनाचे “स्वच्छ भारत अभियान” आणि राज्य शासनाचे “स्वच्छ महाराष्ट्र अभियान” प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती ही स्पर्धा आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी “पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार” देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. “तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार” स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे.

विविध विकासकामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल. वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे. उपरोक्त सर्व स्पर्धेविषयीची सविस्तर माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here