घरातून चालवायचा सट्टापट्टी! २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त: क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई

वर्धा : सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ड्रीमलॅन्ड सिटी येथील घरात आरोपी निवृत्ती उर्फ सोनू हनुमंत निवल हा सट्टापट्टी चालविताना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी छापा मारून चारही सटोड्यांना बेड्या ठोकून सट्टापट्टी हारजीतच्या खेळातील रोख रक्‍कम व इतर साहित्य असा एकूण २ लाख ३२ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई क्राईम इंटेलिजन्स पथकाकडून करण्यात आली. निवृत्ती उर्फ सोनू हनुमंत निवल, दुर्गेश रमेश सुखीजा रा. गणेशनगर, राकेश रमेश सुखीजा, पंकज संतोष पाटील रा. बोरगाव अशी अटक केलेल्या सटोड्यांची नावे आहेत.

निवृत्ती उर्फ सोनू निवल याच्या राहत्या घरातून सट्टापट्टीचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी निवृत्ती निवल याच्या घरी छापा मारला असता त्याच्यासोबत तीन आरोपींनी घरातच जुगारअट्टा भरून हारजितीचा खेळ चालविताना रंगेहाथ मिळून आले. घराची तपासणी केली असता ४५ हजार ५६० रुपये रोख रक्‍कम, सट्टापट्टीसाठी लागणारे साहित्य, सात अँन्डरॉईड मोबाइल, दोन दुचाकी असा एकूण २ लाख ३२ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून सट्टापट्टीचालकांचा वावर वाढला होता.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, रोशन निंबाळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, धीरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, प्रफुल्ल वानखेडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here