
वर्धा : कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, त्याची माहिती रुग्णांना वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा. जिल्ह्याला १,३७८.६ क्युबिक मीटरप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. सेवाग्राम येथे लिक्विड ऑक्सिजनसाठी नवीन टँक सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कोविड स्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आ. रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, वर्धा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विपीन पालीवाल यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून नागरिकांना जिल्ह्यातील कोणत्या रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये किती रुग्णखाटा उपलब्ध आहेत, याची माहिती दूरध्वनीवर उपलब्ध करून देण्यात यावी. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आर्वी व हिंगणघाट येथे एकूण ११४० खाटा उपलब्ध आहेत. यापैकी ६९५ खाटांवर कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत, तर ४९५ खाटा रिक्त आहेत. ११४० बेडपैकी १०२० ऑक्सिजन बेड असून, ६८ व्हेंटिलेटर आहेत. यामध्ये १३७८.६ क्युबिक मीटर ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. सेवाग्राम येथे लिक्विड ऑक्सिजनसाठी नवीन टँक सुरू करावी, असेही ना. केदार यांनी यावेळी स्पष्ट केले.




















































