महामार्गावर द बर्निंग ट्रक’चा थरार! हळदगाव पाटीनजीक घटना

समुद्रपूर : महामार्गाने निघालेल्या भरधाव ट्रकच्या मागील चाकाने पेट घेतला. घटना लक्षात येताच चालकाने वाहनावर ताबा मिळवत वाहन थांबविले. पाहता पाहता ट्रक जळून राख झाला. ही घटना बुधवारी १० रोजी सकाळी ६:०० वाजताच्या सुमारास तालुक्‍यातील हळदगाव पाटी परिसरात घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवित हानी टळली.

माहितीनुसार राजस्थान येथून ट्रक एचआर ४७ इ ९३६७ क्रमांकाचा ट्रक लोणचे घेऊन बंगळुरूच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, हळदगाव परिसरात सकाळी ट्रकच्या मागील चाकातून धूर निघत असल्याचे चालक प्रमोदकुमार दिलदार (रा. उत्तर प्रदेश) याच्या निदर्शनास येताच त्यांनी वाहनावर नियंत्रण मिळवून वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. दरम्यान, पाहता पाहता ट्रक जळून राख झाला. घटना लक्षात येताच समुद्रपूर येथील व्यापारी शेख मोहमद यांनी तातडीने १०० क्रमांकावर माहिती दिली. जाम महामार्ग पोलिस मदत केंद्राला माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. हिंगणघाट अग्निशमक दलाने हळदगाव पाटीला पोहचून आश विझविली. ट्रकमधून वाहतूक होत असलेले लोणच्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसात घेतली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here