
समुद्रपूर : बालिका वधू आणि बालक वर हे दोघेही नातेसंबंधातील असल्याने दोघांच्या घरच्यांनी विवाह निश्चित केला. विवाहाची पूर्ण तयारी करून वर्धू- वराकडील मंडळी मंडपात दाखल झाली. नववधू-वरांवर अक्षता पडणार तेवढ्यात महिला व बालविकास विभाग आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी धडकल्याने बालविवाह रोखण्यात यश आहे. हा प्रकार समुद्रपूर तालुक्यातील कोरा या गावात घडला असून चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कार्यवाही पूर्ण झाली.
समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावात बालविवाह होणार असल्याची माहिती वर्ध्याच्या महिला व बाल विकास विभागाला मिळताच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मनीषा कुरसंगे व बाल कल्याण समिती अध्यक्ष स्मिता बढिये यांच्या समन्वयाने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी यांच्या
मार्गदर्शनात गिरड पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी वैशाली मिस्किन, चाइल्ड हेल्प लाइनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, समुपदेशक माधुरी शंभरकर यांनी विवाहस्थळ गाठले. यावेळी पोलिस कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी एच.बी.भोमले यांनी विवाह मंडपातील दोन्ही बाजूच्या वऱ्हाड्यांना कायदा समजून सांगितला.























































