

वर्धा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट देत त्यांच्या विचारांना अभिवादन केले. या भेटीदरम्यान त्यांनी प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसेच बापुकुटी परिसरात बेल प्रजातीच्या वृक्षाचे रोपण केले.
आश्रमात आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे व विश्वस्त चंदनपाल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. यानंतर त्यांनी बापूंचे पहिले निवासस्थान असलेल्या ‘आदि निवास’ तसेच बापुकुटीला भेट देऊन पाहणी केली. बापूंच्या वास्तव्याशी संबंधित विविध स्थळांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
तसेच कस्तुरबा गांधी यांचे ‘बा’ निवास आणि बापूंच्या तत्कालीन कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. आश्रमातील साधेपणा आणि शांततेचा अनुभव घेत राष्ट्रपतींनी चरख्यावर प्रत्यक्ष सुत कातले. भेटीनंतर त्यांनी बापुकुटी परिसरात बेल प्रजातीच्या वृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या प्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी वान्मथी सी., विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी सेवाग्राम हेलिपॅडवर राष्ट्रपतींचे आगमन होताच मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे सेवाग्राम परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

























































