
वर्धा : जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी राबविलेल्या ‘वॉश आऊट’ मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या विशेष मोहिमेत तब्बल २२९ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे १ कोटी ६९ लाख २३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ६ आणि ८ मे रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात आली. गावोगावी सुरू असलेल्या अवैध दारूविक्री, हातभट्टी आणि देशी-विदेशी दारूच्या बेकायदेशीर धंद्यांवर अचानक धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरासह ग्रामीण भाग, जंगल परिसर तसेच दुर्गम ठिकाणी पथके तैनात करण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास एकाच वेळी छापेमारी करत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण २७२ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाने दिली.
या कारवाईसाठी चार उपविभागीय पोलिस अधिकारी, ५७ अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर शाखांतील मिळून सुमारे २७० पोलिस कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली होती. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी धाडसत्र राबविण्यात आले.
दरम्यान, अवैध दारू तयार करणारे, पुरवठा करणारे आणि विक्री करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


























































