
वर्धा : जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात उपविभागीय पोलिस कार्यालयाने धडक कारवाई करत देशी दारूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील जिल्ह्यातून चारचाकी वाहनाने अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावंगी मेघे येथील तपासणी नाक्यावर सापळा रचण्यात आला. दरम्यान, पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार पुलगाव रस्त्याने सालोड टी-पॉईंटकडे जाताना दिसून आली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन सोडून पळ काढला.
वाहनाची तपासणी केली असता डिकीत व मागील सीटवर निळ्या रंगाच्या प्लास्टिक चुगड्यांमध्ये टँगो पंच कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या ९० एमएलच्या ५ हजार शिश्या आढळून आल्या. या दारूसाठ्याची किंमत सुमारे ३ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या स्विफ्ट डिझायर कारची किंमत अंदाजे ४ लाख रुपये असून एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेस्वर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलिस अंमलदार गजानन लामसें, संजय बोंगा, पवन निलेरकर, अरविंद घुगे, समीर शेख, प्रमोद वाघमारे तसेच सायबर सेलच्या पथकाने सहभाग घेतला.























































