विदेशी कंपनीत पैसे गुंतविण्याचे आमिष देत २०.४० लाखांचा गंडा! विविध कलमान्वये गुन्हा दाखल

वर्धा : विदेशी कंपनीत पैसे गुंतविल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, अशा आमिषाला बळी पडून व्यक्तीला तब्बल २० लाख ४० हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अरविंद नारायण नंदनवार हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उत्पादीत बँडेज व कोटन विकण्याचा व्यवसाय करतो. १३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर जयदीप कोठारी याने फोन करून मी ग्रो फरेक्स ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीचा सिनिअर एक्झिक्युटिव्ह असून आमच्या कंपनीत रक्कम गुंतविल्यास त्याचा चांगला परतावा मिळेल कपंनीचे मुख्य कार्यालय युनायटेड किंगडम येथे असून भारतात याची शाखा दिल्ली व मुंबई येथे असल्याचे सांगितले. गणेश फेस्टिव्हलमध्ये पैसे गुंतविल्यास तुम्हाला अतिरिक्त बोनस मिळेल.

विदेशी कंपनी असल्याने संपूर्ण व्यवहार डॉलरमध्ये चालत असल्याने चांगला परतावा मिळेल, अशी भूलथाप दिली. त्यानंतर सचिन मराठे आणि प्रशांत वर्मा यांनीही वारंवार फोन करुन विश्‍वास संपादीत केला. तिघांच्याही भुलथापांना बळी पडून अरविंद नंदनवार याने कंपनीत ट्रेडिंग खाते उघडले. त्यानंतर अरविंदने तिघांच्या सांगण्यावरून वारंवार अकाऊंटवर पैसे जमा केले. असे त्याने तब्बल २० लाख ४० हजार रुपये जमा केल्यावर त्याला परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अरविंदने याबाबतची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी जयदीप कोठारी, सचिन मराठे, प्रशांत वर्मा यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here