Home जिल्हा वर्धा एका वर्षातच ‘फाटला’ रस्ता ; सेवाग्राम-पवनार मार्गावर जीव धोक्यात

एका वर्षातच ‘फाटला’ रस्ता ; सेवाग्राम-पवनार मार्गावर जीव धोक्यात

पवनार : कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला सेवाग्राम–पवनार मार्ग अवघ्या एका वर्षातच भेगांनी विदीर्ण झाला असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांच्या जीवितालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यानेच सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाकडे जाण्याचा प्रमुख मार्ग असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खोल व लांब भेगा पडलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी या भेगा इतक्या खोल आणि रुंद आहेत की दुचाकी वाहनांचे चाक थेट त्यामध्ये अडकण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अचानक तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिकांच्या मते, अनेक वेळा वाहनचालकांनी थोडक्यात बचाव केल्याच्या घटना घडल्या असून, मोठा अपघात कधीही घडू शकतो.

दररोज या मार्गावरून कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी, नियमित तपासणीसाठी ये-जा करणाऱ्या रुग्णांची व गर्भवती महिलांची संख्या मोठी आहे. अशा संवेदनशील रुग्णांना या खराब रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिकांनाही या भेगा व खड्ड्यांमुळे वेग कमी करावा लागतो, परिणामी वेळेवर उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

विशेषतः गर्भवती महिलांसाठी हा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे. अचानक लागणारे धक्के, खोलगट भेगा आणि असमतोल रस्ता यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी बिकट होते. अपुऱ्या प्रकाशयोजनेमुळे रस्त्यावरील भेगा स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अचानक आलेल्या या खोल भेगांचा अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका अनेकपटीने वाढतो. काही ठिकाणी कोणतेही इशारा फलक किंवा सुरक्षा उपाययोजना नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, हा रस्ता नुकताच तयार करण्यात आला होता. मात्र, एवढ्या कमी कालावधीत त्याची झालेली दुरवस्था ही कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने संताप वाढत आहे. एखादा मोठा अपघात घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिकांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून, कामाच्या दर्जाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.


‘मृत्यूचा रस्ता’…

सेवाग्राम–पवनार मार्ग आता थेट अपघाताचा सापळा बनला आहे. एका वर्षातच रस्ता फाटणे म्हणजे निकृष्ट व संशयास्पद कामाचा स्पष्ट पुरावा. कस्तुरबा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णांचे जीव रोज धोक्यात टाकले जात आहेत, तर गर्भवती महिलांसाठी हा प्रवास अक्षरशः जिवाशी खेळ ठरत आहे. रात्रीच्या अंधारात खोल भेगा दिसत नसल्याने अपघात अटळ होत आहेत. प्रशासन आणि ठेकेदारांची बेफिकिरी कळसाला पोहोचली असून, मोठा अपघात झाल्यावरच का हालचाल होणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!