
वर्धा : तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांची पेरणी आटोपली आहे. मात्र, पावसाने आठ दिवसांपासून दांडी मारल्याने बळिराजा दुबार पेरणीच्या संकटात सापडलेला आहे. पीक कर्जाची आतुरतेने वाट पाहत आहे. आतापर्यंत केवळ ५० टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले. उर्वरित शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, बँक अधिकारीवर्गाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरीबांधवांना कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळणे गरजेचे आहे. याकरिता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पाटील फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पीक कर्ज सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आली आहे. पीक कर्ज मिळण्यासाठी काही समस्या किंवा अडचणी असल्यास त्यांनी ११ जुलैपर्यंत सहाय्यता कक्षाचे संपर्क प्रमुख समीर राऊत, डाॅ. कपिल मून यांच्याकडे तक्रार नोंदवावी. तक्रारीमध्ये बॅकेचे नाव, शेतकऱ्यांचे नाव, पीककर्ज अर्जांची तारीख, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची नावे, संपर्क क्रमांक लिहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.