शेतकऱ्यांना आर्थिक फटका! नाफेडच्या खरेदीअभावी शेकडो क्विंटल चणा बेवारस; देवळी-पुलगाव बाजारपेठेतील अवस्था

देवळी : नाफेडकडे विक्री करण्याकरिता ऑनलाइन नोंदणी करण्यात आली; परंतु नाफेडने खरेदी बंद केल्याने आता शेकडो क्विंटल चणा देवळी व पुलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये बेवारस स्थितीमध्ये पडून आहे. पंधरा दिवसांपासून ही अशीच अवस्था असल्याने आता हा चणा खराब होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पावसाचे पाणीही या शेडमध्ये शिरत असल्याने चण्याची गुणवत्ता खराब होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

बारा दिवसांपूर्वी खरेदी-विक्री समितीच्या ग्रेडरने नाफेडच्या चणा खरेदीत एका शेतकऱ्यांकडून सहा हजारांची लाच घेतल्याचा आरोप स्थानिक संघर्ष मोर्चा संघटनेने करून गोंधळ घातला होता. देवळी पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेले होते. तेव्हापासून देवळी व पुलगाव केंद्रावरील नाफेडची चणा खरेदी बंद करण्यात आली. आता जिल्ह्यातील सात केंद्रांवर सुरु असलेली नाफेडची चणा खरेदीही मुदत संपल्याने बंद केली आहे.

देवळीमध्ये १ हजार शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे. यापैकी ३४२ शेतकऱ्यांकडून ५ हजार ४६८ क्विंटल चण्याची खरेदी करण्यात आली. पुलगाव येथील केंद्रावर ६०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी २५८ शेतकऱ्यांकडून 3 हजार ८९८ क्विंटल चण्याची खरेदी करण्यात आली. अद्यापही दोन्ही केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या जवळपास १ हजार शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल चणा बाजार समितीच्या शेडमध्ये पडून आहे. याची खरेदी करण्यासाठी नाफेडकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शासकीय हमीभाव ५ हजार १०० रुपये असताना आता खासगी व्यापाऱ्यांना ४ हजार ५००ते ४ हजार ७०० रुपये दरात चणा विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून पुन्हा नाफेडने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here