बनावट नोटांचे दिल्लीसह सोलापूर कनेक्शन! बाजारात, पेट्रोल पंपांवर नोटा चालविल्याची कबुली

वर्धा : बनावट नोट प्रकरणात दिल्लीसोबतच आरोपींचे सोलापूर कनेक्शन समोर आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे गुप्तचर पथकाने सोलापूर येथून चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यापैकी एकजण संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. तपासात आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्‍यता आहे.

पोलिस अधीक्षकांच्या गुन्हे गुप्तचर पथकाने निखिल लोणेरे, स्वप्नील उमाटे, प्रीतम हिवरे आणि साहिल साखरकर यांना अटक केली असून त्यांना 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या नोटांचा क्रमांक आणि रंग एकच होता. आरोपींनी 26 हजार रुपयांच्या बनावट नोटा मार्केट तसेच काही पेट्रोलपंपावर चालविल्या आहेत. सदर चारही आरोपी कोणाच्या संपर्कात होते, याचा तपास सुरू आहे. गुप्त माहितीच्या आधारे त्यांचे मोबाइल संपर्क तपासले, त्या आधारे एक पथक सोलापूर रवाना झाले होते. तेथून शुक्रवारी मध्यरात्री 4 वाजताच्या सुमारास चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यापैकी एक अटकेतील आरोपींच्या संपर्कात होता.

चलनात आणलेल्या नोटांचे काय?

सदर आरोपींनी पाचशे रुपयांच्या 94 हजारांच्या नोटापैकी तब्बल 26 हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात वितरित केल्या आहेत. त्यामुळे सदर बनावट नोटा वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय चलनात आल्या असल्याने सदर नोटांचा पोलिसांना शोध घेणे मोठे आव्हानात्मक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here