घरातील सोन्याचा हंडा काढून देण्याच्या नावाखाली 50 हजाराने फसविले! आर्वी पोलिसांकडून आरोपी अटक

आर्वी : सोन्याचा हंडा काढून देण्याच्या नावाखाली महिलेला चार व्यक्‍तींनी ५० हजारांनी गंडविले. ही घटना तालुक्‍यातील वाढोणा येथे घडली असून तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. इंदिरा मुलाबराव राऊत (४०) रा.वाढोणा असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे.

त्यांच्याकडे ९ मार्च रोजी लुंगी व हिरवे कपडे घातलेला एक व्यक्‍ती आला. त्याने इंदिराबाई यांना १० रुपये खैरात मागितली. ती दिल्यानंतर त्याने फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यावर झाडू मारुन व फोटो दाखवून तुमच्या घरात सोन्याचा हंडा असल्याचे सांगितले. तो काढण्यासाठी सहा हजारांची मागणी केली. ती मागणी इंदिराबाई यांनी पूर्ण केली. त्यांच्याकडे नाव विचारले असता रोशन व मनोज बाघ रा. वकील परसोडी ता. कळमेश्वर जि. नागपूर असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा ११९ मार्चला सकाळी ८ वाजता पुन्हा दोघेजण आले व त्यांनी घरातील पोचं येथे जमिनीतून हंडा काढून दाखविला.

त्यामध्ये सोन्याची मूर्ती व दगड असल्याचे ‘भासविले, त्यानंतर पुन्हा १३ हजारांची मागणी केली. तीही पूर्ण केली. तसेच त्याचजागी एक हिरा असल्याचे सांगून पुन्हा २९ हजारांची मागणी केली. असे वारंवार त्यांनी ५० हजार रुपये महिलेकडून उकळले. अखेर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच इंदिरा राऊत यांनी आर्वी ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा नोंद करीत रोशन, मनोज वाघ, असाराम व औषधी विक्रेता एक व्यकती अशा चार जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळूंखे, ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर, पीएसआय हर्षल नगरकर, इमरान खिलची, किशोर साटोणे, खेमसिंग कोहचडे, विनोद मस्के यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here