दारू पिण्या-पाजण्याच्या वादातून एकाची निर्घृण हत्या! चौघे गंभीर जखमी; सशस्त्र हाणामारी

नागपूर : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादाचे पर्यवसान सशस्त्र हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून चाकू, तलवार आणि लाठ्याकाठ्या चालविण्यात आल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. बेलत रोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसोडीत गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.

वर्धा मार्गावरील परसोडीच्याश्रमिकनगरात राहणारा रामस्वदीप ऊर्फ लाला रामलोचन पटेल (वय २४), त्याचा मित्र राज संतोष कावरे (वय १८) आणि प्रतीक ऊर्फ गोलू (वय २०) हे तिघे गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ट्रिपल सीट जात होते. याच भागात राहणारे आरोपी अजय बोरगे, सचिन बोरगे, अमित बोरगे आणि रजत हंसराज बागडे या चौघांनी त्यांना थांबविले. आरोपींनी लाला व त्याच्या मित्राला दारू पिण्यास पैसे मागितले. लाला आणि त्याच्या मित्रांनी दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी वाद घातला. बाचाबाचीमुळे ते हातघाईवर आले. त्यानंतर दोन्हीकडचे साथीदार धावले. त्यांनी एकमेकांवर चाकू, तलवार आणि लाकडी दांड्याने हल्ला चढविला.

यात राज कावरे, प्रतीक ऊर्फ गोलू, तसेच आरोपीच्या गटातील तिघे गंभीर जखमी झाले. या सशस्त्र हाणामारीमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. बाजूच्या मंडळींनी धाव घेऊन त्यांना कसेबसे आवरले. जखमींना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, माहिती कळताच बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी त्या भागातील मंडळींचे, तसेच जखमींचे जाबजबाब नोंदवून घेतले.

त्यानंतर लाला पटेल याच्या तक्रारीवरून आरोपी अजय, सचिन आणि अमित बोरगे, तसेच रजत बागडे या चौघांविरुद्ध हत्या करणे, तसेच हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. हाडगे फरार असून, पोलीस त्याचा छोध घेत आहेत. त्याचप्रमाणे अजय बोरगेच्या तक्रारीवरून आरोपी लाला पटेल, गोलू पटेल, लंकेश ऊर्फ अंकुश पटेल, शुभम पटेल, डिके ऊर्फ रक्षक खोब्रागडे, पीयूष शुक्ला, अक्षय मडावी व सुभाष शाहू यांच्यावर गुन्हा दाखल केला. सहा जणांना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here