
वर्धा : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने सेवाग्राम येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या ठिकाणाहून त्याने कोविड केअर सेंटरची खिडकी तोडून पलायन केल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी हालचालींना वेग देत पसार झालेल्या आरोपीला पांढरकवडा येथून ताब्यात घेतले.
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांवर सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयात उपचार केले जात आहेत, तर जिल्ह्यात नवीन रुग्ण सापडण्याची अती वाढल्याने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. या कोविड केअर सेंटरमध्ये ज्या कोरोनाग्रस्ताच्या घरी विलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही, अशांना ठेवले जात आहे. सेलू पोलीस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.
याच दरप्यान या आरोपीचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला सुरुवातीला कारागृहातील क्वारंटाईन विभागात ठेवण्यात आले होते. पण, प्रकृती खालावल्याने त्याला सेवाग्राम येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. याच ठिकाणी आरोपीने खिडकी तोडून पळ काढला. ही बाब लक्षात येताच या पळकुट्या आरोपीविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, शिवाय पोलिसांनी आपल्या हालचालींना गती देत. त्याला यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून ताब्यात घेतले आहे.