

कारंजा (घाडगे) : तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रमशाळेत बुधवारी (दि. ३०) रक्षाबंधनाच्या दिवशी एका विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या पालकांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून, घातपाताचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
आश्रमशाळेतील १३ वर्षीय विद्यार्थी शिवम सरोज उईके, रा. डोमा, ता. चिखलदरा, जि. अमरावती याचा गादीखाली दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृत शिवम इयत्ता सातवीमध्ये होता. शिवम शाळेतील होस्टेलच्या गाद्या ठेवतात त्या खोलीत गाद्यांच्या ढिगावर झोपला होता. झोपता झोपता त्याने कड पलटवण्याचा प्रयत्न केला असता, तो खाली पडला. त्याच्या अंगावर गाद्या पडल्या. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शाळा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
शिवम हा सकाळी ७:३० ते ८:३० च्या दरम्यान नाश्ता घेण्यासाठी उपस्थित होता. सकाळी ९ वाजता त्याने वर्गात हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर तो दिवसभर दिसला नाही. रात्री ८:३० च्या सुमारास त्याचा मृतदेहच सापडला. घटना घडताच आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक पालक आपल्या पाल्यांच्या भेटीसाठी शाळेत आले आहेत. आदिवासी आश्रमशाळेत वर्ग पहिली ते दहावीपर्यंतचे सुमारे २८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थी मेळघाट व मध्य प्रदेश परिसरातील आहेत.