सुसाट वाहनाने पादचाऱ्यास चिरडले! रस्त्यालगत आढळला मृतदेह

सेलू : पायदळ जाणाऱ्या व्यक्‍तीला भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी नोंद घेतली. रामदास विश्‍वनाथ सिंदीमेश्राम (५५, रा. सुरगाव) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, रामदास हा रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. ७ रोजी सायंकाळच्या सुमारास तो सुरगावकडून सेलूकडे पायदळ जात होता. दरम्यान, निर्मल जिनिंगसमोर मागाहून भरधाव जाणार्‍या वाहनाने त्यास धडक दिली. या अपघातात तो रस्त्याकडेलाच विव्हळत पडून राहिला. अपघातानंतर त्याला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने त्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याचा मृतदेह रस्त्याकडेला पडून दिसला. मात्र, कुणीही याकडे लक्ष दिले नाही. सोमवारी सकाळी रस्त्याच्या लगतच त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here